देवळाली प्रवरेच्या ग्रामिण रुग्णालयाची मुख्यमंत्र्याकडुन दखल.
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध
अंतराष्ट्रीय खेळाडु आप्पासाहेब ढुस यांनी ई-मेल द्वारे मांडलेल्या देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालय प्रश्नाची मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दखल घेतली असून मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी हा मेल राज्याचे ग्रामविकास व आरोग्य सचिव यांना पाठविला आहे. देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर हे गाव क वर्ग नगरपालिका क्षेत्र असून सण २०११ च्या जनगणने नुसार या गावची लोकसंख्या ३०९९७ इतकी आहे. तसेच या गावाच्या महसूल मंडलास लगतची ४२ गावे जोडली गेली आहेत. व या सर्व गावांचा देवळाली प्रवरा गावासी विविध कारणास्तव सततचा संपर्क येतो.
देवळाली प्रवरा व त्याच्या महसूल मंडलातील गावांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना देवळाली प्रवरा गावच्या जवळपास २० कि.मी. परिघामध्ये अतिदक्षता विभागासारखी अद्यावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.
सध्या देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु त्यामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग व अपुऱ्या वैद्यकीय सुविधेमुळे येथील नागरिकांना वैद्यकीय सुविधेसाठी सर्वस्वी शेजारच्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. व ते येथील सर्वसामान्य जनतेला परवडत नाही. म्हणून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होणे अत्यंत गरजेचे आहे.
तरी आपणास विनंती की, मौजे देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे खास बाब म्हणून अद्यावत सुविधांनी युक्त असे ग्रामीण रुग्णालय मंजूर होणे कामी संबंधित मंत्रालयास योग्य ते आदेश देऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेतली असून सदर निवेदन राज्याचे ग्रामविकास व आरोग्य सचिव यांना पुढील कार्यवाहीसाठी अग्रेसीत करण्यात आले आहे. मंत्रालय पातळीवर देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न विचारात घेतला गेल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल याबद्दल ढुस यांनी समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment